श्री गुरुतत्त्व

मुलांनो,
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा गुरुप्रणित मार्ग आहे. तो गुरुतत्त्वाचा मार्ग आहे. आपले सर्व जीवन व्यवहार गुरु तत्वाच्या आधारेच होतात. गुरुतत्त्वाच्या आधारानेच जग चालते.

गुरु, सद्गुरू, परमगुरु, परात्पर गुरु व गुरुतत्त्व या गुरुतत्वाच्या पाच पायऱ्या आहेंत. तसच मानवाला 'मानव" होण्यासाठी पाच गुरु आवश्यक असतात. माता, पिता, शिक्षक, उदरनिर्वाहाचे शिक्षण देणारे व्यवसाय शिक्षक व मन:शांती देणारे आध्यात्मिक गुरु असतात. मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्यदेवो भव। अतिथी देवो भव। राष्ट्र देवो भव। हा संदेश देवून भारतीय संस्कृतीने गुरूची थोरवी सांगितलेली आहे. माता, पिता व शिक्षक आपले गुरु आहेत. भगवान दत्तात्रय हे कलियुगाचे चालक, मालक, पालक आहेत. त्यांना गुरूंचे गुरु असे म्हटले जाते. सर्व जगताचे ते गुरु आहेत व अंतीम गुरुतत्व ही तेच आहेत. भगवान दत्तात्रेयांनी कालानुरुप विविध मानवी आविष्कार मानव कल्याणासाठी धारण केले. श्री स्वामी समर्थ हा त्यांचाच पूर्णब्रह्म अविष्कार आहे. गुरुतत्त्व हे निर्गुण निराकार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे निर्गुण गुरुतत्वाचे सगुण रूप होय.

परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज ।
सद्गुरू प.पू.पिठले महाराज ।
सद्गुरू प.पू. मोरे दादा ।
गुरुमाऊली प.पू श्री आण्णासाहेब मोरे ।

अशी आपल्या मार्गाची गुरूपरंपरा आहे.
"श्री स्वामी समर्थ महाराजांना भूषणावह होईल असे वागावे व महाराजांच्या इच्छेत इच्छा मिसळून राहावे" हे आपल्या मार्गाचे ब्रीद आहे .

दत्त महाराजांचे गुरु

श्री दत्त महाराजांनी २४ गुरु केले. त्यांनी प्रत्येका कडुन एक एक गुण घेतला आणि त्यांना गुरु केलं. एकदा दत्त महाराज एका गावातुन जात होते. रस्त्याच्या कडेला एक लोहार लोखंड गरम करुन त्यावर घाव घालत काहीतरी बनवत होता. तो लोहार त्याच्या कामामध्ये मग्न होता. एवढ्यात तिथुन त्या राज्यातल्या राजाची सवारी आली. राजा म्हणाला म्हणजे त्याचा लवाजमा मोठा म्हणायचा. त्याच्या सवारी बरोबर ढोल – ताशे वाजत होते. ती सवारी हळु हळु तिथुन गेली. तो लोहार मात्र त्याच्याच कामात मग्न होता. थोड्यावेळाने एक शिपाई मागुन आला. त्याने लोहाराला विचारले, 'अरे! राजाची सवारी इथुन गेली का?' लोहार म्हणाला, 'मला माहित नाही बाबा. मी माझं काम करत आहे.' शिपाई चिडला आणि त्याच्यावर ओरडत निघुन गेला की काय राजाची सवारी जाते आणि याला कळत सुध्दा नाही, हा याच्या कामात काय खरच इतका मग्न होता'.

श्री दत्त महाराजांनी ते बघितले आणि तिथेच त्या लोहाराला आपला गुरु मानत म्हणाले, 'धन्य आहे तुझी एकाग्रता! मी सेवा करत असतांना किंवा काम करत असतांना मलाही अशीच एकाग्रता लाभु दे!"

तात्पर्यः-
१. मानसाने प्रत्येकाकडुन काही ना काही शिकत राहावं.
२. कुठलही काम करत असतांना ते एकाग्रतेने करावं.
दयानंद सरस्वती

स्वामी दयानंद सरस्वती लहान असतानाची गोष्ट आहे.ते एका गुरुजींकडे शिष्य म्हणून राहत होते,त्यांचे गुरूजी अत्यंत विद्वान होते परंतु दोन्ही डोळ्यांनी अंध होते. या गुरुजींची शिस्त अत्यंत कडक होती त्यांना आश्रमाच्या आवारात केरकचरा खपत नसे. हा केर काढण्याचे काम बाल द्यानंदाकडे होते. एक दिवस काही कारणास्तव दयानंद केर काढू शकले नाही. आश्रमात फिरत असताना गुरुजींच्या पायाला कचरा जाणवला आणि त्यांना अत्यंत राग आला. त्यांनी छोट्या द्यानंदाला बोलावले आणि त्यांना दांडूक्याने बडविणयास सुरुवात केली, त्यांनी इतके मारले कि दांडूका पार मोडून गेला पण द्यानंदानी तोंडातून अवाक्षर काढले नाही. गुरुजी शांत झाल्यावर दयानंद त्यांचे हात दाबीत म्हणाले, "गुरुजी, आपणास फारच त्रास झाला नाही का? यापुढे आपण स्वतः मला मारण्याचे श्रम घेवू नका. दुसऱ्या कोणाकडून तरी मला शिक्षा करा आपण त्रास घेवू नका. छोट्या द्यानंदांचे ते उद्गार ऐकून गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले व त्यांनी प्रेमाने द्यानंदास पोटाशी धरले.

तात्पर्य:- गुरूंनी शिक्षा केली तरी ती आपल्या चुकीसाठीच आहे हे जाणून गुरुंकडे आदराने, काळजीने पाहणारच खरा शिष्य असतो. असे शिष्य स्वतः बरोबरच गुरूलाही श्रेष्ठता देतात.
आर्य चाणक्य

पूर्वीच्या काळी आर्य चाणक्यांकडे बरेच तरूण आणि किशोरवयीन मुले शिकण्यास होती. या मुलांना आर्य चाणक्य रोज सकाळी जंगलात लाकडे पाठवीत असत. दुपारी मुले परत आली तरीही त्यांना विश्रांती न देता शेतीची कष्टांची कामे करण्यास सांगत असत. उन्हातान्हात काम करून ही मुले प्रचंड थकून देतात हे आर्य पाहात असत तरीही रोजच्या शिक्षणात ते खंड पडू देत नसत. एकदा चाणक्यांचे एक स्नेही त्यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी या मुलांचे कष्ट पहिले व आर्यास म्हणाले, "गुरुवर्य, आपण या मुलांकडून सकाळीच काम का करून घेत नाही? कारण दुपारच्या वेळी कष्ट केल्यामुळे ती खूप दमतात." तेव्हा आर्य चाणक्य म्हणाले, "ही मुले सध्या पारतंत्र्यात आहेत. त्यांना उद्या स्वातंत्र्यासाठी लढावे लागणार आहे. देशासाठी प्रचंड हाल-अपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत. दिवस –रात्र यासाठी त्यांना कष्ट करावे लागतील. या कष्टाची सवय त्यांना आतापासूनच झाली तर नंतर त्यांना या सर्वांचा त्रास होणार नाही. म्हणूनच मी आतापासूनच त्यांना या श्रमाची सवय लावतो आहे." आर्य चाणक्यांचे हे उद्गार त्यांच्या स्नेह्याला पूर्णपणे पटले.

तात्पर्य :- सतत श्रमाची सवय अंगी बाणवणे केव्हाही हिताचे ठरते.
आदर्श शिष्य - श्रीकृष्ण

आपल्या किशोर वयातच श्रीकृष्णाने कंसाचा वध करून आपले ईश्वरत्व सिद्ध केले होते. त्याकाळाच्या सर्वश्रेष्ठ अशा साम्राज्याचा तो युवराज होता. श्रीकृष्ण लहानपणापासूनच प्रचंड पराक्रमी होता. पण गुरु सांदिपनींच्या आश्रमात आल्यावर त्याने आपले अधिकार, संपत्ती, असाधारणता यांचा त्याग करून गरीब ब्राह्मणाचा मुलगा सुदामा याच्याशी मित्रता केली. दोघे समान भावाने रहात होती. अश्रामाचे नियम पालन करित होते. गुरुसेवेसाठी श्रीकृष्णाने जंगलातून लाकडे, समिधा आणणे, गाई चारणे, पाणी भरणे, आश्रम स्वच्छ करणे इत्यादि कामे नेमून दिल्याप्रमाणे केली. सांदिपनी सर्व शिष्याना समान भावाने वागवीत असत. गुरुकुलात श्रीकृष्णाने उत्तम शिष्याच्या रुपाने सर्व ज्ञान एकाग्रतेने ग्रहण केले व नियमांचे कठोर पालन करून गुरुसेवाही श्रद्धेने केली.

श्रीकृष्णाचे शिक्षण

श्रीकृष्ण सांदिपनी गुरुंच्या आश्रमात विद्याअध्ययनासाठी गेला होता. तेथेच गरीब ब्राम्हणपुत्र सुदामाशी त्याची घनिष्ट मित्रता झाली. व्दारकेचा राजपुत्र, मथुरेचा वारस असूनही सांदिपनीकडे श्रीकृष्ण फक्त विद्यार्थी होता. भगवान श्रीकृष्ण व सुदामा दोघे जंगलात लाकडे आणण्यासाठी बरोबर जात असत. सांदिपनीच्या आश्रमात श्रेष्ठ-कनिष्ठ, ज्ञान व कर्म असा कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळे श्रीकृष्णाला इतर सर्व मुलांसारखीच शिस्त पाळून कामे करावी लागत. कृष्णही न कंटाळता आनंदाने सर्व कामे करीत असे. श्रीकृष्णाचे वडील वासुदेव राजा होते. पण त्यांनी ही सांदिपनींकडे कुठल्याहीप्रकारची सवलत पुत्रासाठी मागितली नाही. त्याकाळी गुरूंच्या ज्ञानाचा धाक, दरारा राजावर होता.
- ' मातृह्स्तेन भोजनम् '-

श्रीकृष्णाने कंसवध केल्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी सांदिपनी ऋषींच्या आश्रमात विद्याप्राप्तीसाठी गेला होता. श्रीकृष्ण अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यात बऱ्याच विद्या त्याने आत्मसात केल्या. सांदिपनी ऋषी ओळखून होते कि– हा असाधारण शिष्य ज्ञानी, विज्ञानी आहे. याला मी काय शिकवणार? पण शिक्षणाचे व्रत घेतलेल्या ऋषींनी आपले काम चोखपणे सुरु ठेवले होते. त्यांनी श्रीकृष्णाला फावल्या वेळात जंगलात जाऊन स्वयंपाकासाठी लाकडे व यज्ञासाठी समिधा आणण्याची आज्ञा केली.
श्रीकृष्ण विनम्र शिष्य होता. गुरुजी आज्ञा मानून त्याने जंगलातून लाकडे व समिधा आणण्याचे काम निष्ठेने सुरु केले. सांदिपनिना श्रीकृष्णाच्या आचरणातून नेहमी आनंद मिळायचा सर्व विद्या शिकून झाल्यावर आश्रमातून घरी परत जायचा दिवस उजाडला. श्रीकृष्ण म्हणाले _ 'गुरुदेव ! आपणच मला काहीतरी द्या.' सांदिपनी म्हणाले 'तसे नव्हे, या गुरुकुलाच्या प्रतिष्ठेसाठी तरी तुला वर मागवा लागेल.' यावर श्रीकृष्णाने ठीक आहे, असे म्हणून वर मागितला -मातृह्स्तेन भोजनम् |' अर्थात जीवन संपेपर्यंत मला आईच्या हातचे भोजन मिळो सांदिपनीनी वर देऊन 'तथास्तु' म्हटले. आई मुलाला भोजन देताना आपले प्रेम व आशीर्वाद देत असते. त्यामुळे देवानाही आईच्या प्रेमाची भूक असते. आईने प्रेमातून शिजवलेल्या अन्नातून शरीराचे व मनाचे पोषण होते.

आई मुलाला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवत असते. म्हणून संस्काराचे कार्य 'मातृमुखेन शिक्षणम्' अशा जिव्हाळ्याने करायला हवे. चंगळवाद व हिंसेवर विजय मिळवण्यासाठी आईकडून बालकांवर संस्कार झाले पाहिजे.

गुरुमाऊलींचा संदेश –विद्यार्थ्यांसाठी

बालगोपालांनी रोज आई-वडिलांना नमस्कार करावा तसेच गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, सूर्य मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, सरस्वती मंत्र रोज म्हणावे. आहार – विहारावर नियंत्रण ठेवावे. संस्कृत श्लोक, स्तोत्र व मंत्राच्या नित्य पाठांतराने स्मरणशक्ती वाढते, वाणीला धार येते, अंगी चातुर्य व धैर्य येते, शब्दोच्चार स्पष्ट करता येतात, निर्भयता निर्माण होते, ज्ञानवृध्दी होते, पापभीरु वृत्ती निर्माण होते, व्यक्तित वैचारिक बैठक व पातळी निर्माण होते, प्रतिभाशक्ती वाढते, सूक्ष्म अर्थांचे आकलन होऊन ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती तीव्र बनते, इ. अनेक फायदे याद्वारे मिळतात. मात्र हे सर्व एकाच दिवशी झटपट होणे शक्य नाही हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे. यासाठी अपार मेहनत घ्यावी लागेल, अखंड सायास करावे लागतील. यशोशिखर गाठणे तितकेसे सोपे नाही; मात्र ध्रुव्राचे मनोबल अंगी असेल तर ते सहज शक्य आहे.