आई – वडिल – पालक

बालकाचे पहिले गुरु हे त्याचे आई आणि वडिल आहेत. मुल जन्मल्यापासुनच त्याच्या सर्वात जवळचे कोणी असेल तर ते त्याचे आई – वडिल असतात. त्याच्या विकासात कारणीभूत अनेक घटकांपैकी पालक हा सर्वात महत्वाचा घटक आहे. तेव्हा सर्वच पालकांनी सर्वात पहिले मनाशी खुणगाठ बांधावी की त्यांच्यावर अवलंबुन एक जीव विकसित होत होत एक मानव म्हणुन विकसित होणार आहे. या 'मानव' संज्ञेमागे खुप मोठं असं अर्थपूर्ण विश्वच आहे.

बालकाच्या जन्मापासुन ते शाळेत जाण्यापर्यंत आपल्या आई वडिलांजवळच राहणारे बालक त्याचे आई - वडिल काय बोलतात, काय खातात, कसं वागतात हे बघतच मोठं होतात. वय वर्षे ५ पर्यंत त्यांच्या मेंदुतील पेशी ज्यास नुरॉन्स म्हणतात त्यांची वाढ होत असते. मुले आपल्या इंद्रियांना समजुन घेत त्यांचा वापर शिकत असतात. त्यातुन चालणं, बोलणं, खाण-पिणं, हाताने वस्तु उचलनं यासारखी कौशल्यं विकसित होतात. मुलं लहान असतांनाच त्यांच्या विकासात मदत करतांना त्यांची विविध कौशल्य विकसित होण्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करायला हवे. मुल रांगायला, चालायला लागल्यावर ते सतत काहीना काही वस्तु हाताळतात. खरतर त्यांना सतत काहीना काही काम करायचं असतं, तेव्हा त्यांच्या कौशल्यात भर पडेल असं त्यांना करण्यासाठी दिल तर अधिक चांगलं. त्यांना लाकडाचे ठोकळे, पेपर यासारखं काही देउन त्यातुन काहीना काही करायला लावा. मुलांना शिकवतांना हळुहळु केंद्रात जाण्याची सवय लावली तर केंद्राचा लळा त्यांना लहानपणापासुन निश्चित लागेल. यावयात मुले सर्वकाही हाताळण्याचा, सर्व काही जाणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्यात तीव्र गहनशीलता असते. त्यामुळे आपण जे काही त्यांना शिकवु, तसं ते शिकत जातात.

शाळेत जायला लागल्यावर थोड्याप्रमाणात बाहेरच्या जगाचा संबंध आलेल्या बालकाच्या विकासात त्याच्या आई वडिलांबरोबर या जगातील इतर घटकांचाही अंतर्भाव व्हायला लागतो. तरिही त्याचे पालकच त्याचे मोठे मार्गदर्शक असतात. वय वर्षे ५ ते १२ या काळात मुलं समुह जीवन जगण्यास नुकतेच शिकत असतात. त्यांच्यात देण्याची सवय लागावी, समुह जीवनासाठी आवश्यक मैत्री, सद्भाव त्यांच्यात जागृत व्हावे यासाठी प्रयत्न करावे. या कालात त्यांना विविध कौशल्ये जसं स्वतःच्या हाताने स्नान, स्वच्छता, पोशाख घालणे, यासारखी स्वावलंबनात्मक कौशल्ये, चेंडुसोबत खेळता येणे, विविध खेळ खेळता येणे यासारखी क्रीडात्मक कौशल्ये आणि परोपकार, शालेय स्नेहसंमेलनात भाग घेणे यासारखी सामाजिक कौशल्ये शिकवावी. या काळापर्यंतच मुलांकडुन अभ्यास करुन घ्यावा लागतो.

त्यानंतर कुमार अवस्थेत मुलं पदार्पण करतात. वय वर्ष १३ ते १५ या कालात मुलांमध्ये भावनिक स्थित्यंतर घडुन येतात. खरतर हा काळ विकासाच्या दृष्टीने आणि मानवी संवेदना जागृत होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा काळ असतो. या काळात मुलांना योग्य मार्गदर्शन होणं गरजेच असतं. या काळात मुलांचा अभ्यास घेण्यापेक्षा जास्त महत्वाचं त्यांच्याशी संवाद साधणं कारण अभ्यास कसा करायचा हे त्यांना कळायला लागलेलं असतं पण भावनांवर नियंत्रण कस मिळवावं, विचारांना कश्या पध्दतीने दिशा द्यावी, व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय, ते कसं विकसित करावं याविषयी मार्गदर्शनाची त्यांना गरज असते. या काळात मुलं विचार करायला लागतात. त्यांच्या विचारांना दिशा देणं आवश्यक असतं नाही तर ते भरकटण्याची शक्यता असते. आपल्या कौटुंबिक स्थितीची इतरांबरोबर तुलना करणं, आपल्या पालकांची ईतरांबरोबर तुलना करणं, वाईट मुलंची संगत यापासुन त्यांना वाचवायला हवं. पालकांच्या वैयक्तिक भाव-विचारांचा, त्यांच्या सवयी यांचा मुलांवर फार परिणाम या काळात बालकांच्या आयुष्यावर होत असतो. निश्चितच चांगल्या सवयी मुलांना आपलंस करतात, त्यांना वाईट सवयींमुळे मुले दुरावतात. तेव्हा घरातील वातावरण नीट ठेवणं हे पालकांच परम कर्तव्या आहे. फक्त मुलांना चांगल्या शाळांमध्ये आणि चांगल्या ट्युशन्समध्ये टाकलं म्हणजे आपली जबाबदारी संपले, हा गैरसमज पहिले मनातुन काढला पाहिजे.

मातृहस्तेन भोजनम्

श्रीकृष्ण कंसवध केल्यानंतर वयाच्या १६ व्या वर्षी सांदिपनी ऋषींच्या आश्रमात विद्याप्राप्तीसाठी गेला होता. श्रीकृष्ण अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यात बऱ्याच विद्या त्याने आत्मसात केल्या. सांदिपनी ऋषी ओळखून होते की, हा असाधारण शिष्य ज्ञानी, विज्ञानी आहे. याला मी काय शिकवणार? पण शिक्षणाचे व्रत घेतलेल्या ऋषींनी आपले काम चोखपणे सुरु ठेवले होते. त्यांनी श्रीकृष्णाला फावल्या वेळात जंगलात जाऊन स्वयंपाकासाठी लाकडे व यज्ञासाठी समिधा आणण्याची आज्ञा केली.

श्रीकृष्ण विनम्र शिष्य होता. गुरुंची आज्ञा मानून त्याने जंगलातून लाकडे व समिधा आणण्याचे काम निष्ठेने सुरु केले. सांदिपनींना श्रीकृष्णाच्या आचरणातून नेहमी आनंद मिळायचा. सर्व विद्या शिकून झाल्यावर आश्रमातून घरी परत जायचा दिवस उजाडला. श्रीकृष्ण म्हणाले, 'गुरुदेव! आपणच मला काहीतरी द्या.' सांदिपनी म्हणाले, 'तसे नव्हे, या गुरुकुलाच्या प्रतिष्ठेसाठी तरी तुला वर मागावा लागेल.' यावर श्रीकृष्णाने ठीक आहे, असे म्हणून वर मागितला "मातृह्स्तेन भोजनम् |" अर्थात जीवन संपेपर्यंत मला आईच्या हातचे भोजन मिळो. सांदिपनींनी वर देऊन 'तथास्तु' म्हटले. आई मुलाला भोजन देताना आपले प्रेम व आशीर्वाद देत असते. त्यामुळे देवांनाही आईच्या प्रेमाची भूक असते. आईने प्रेमातून शिजवलेल्या अन्नातून शरीराचे व मनाचे पोषण होते.

आई मुलाला नेहमी चांगल्या गोष्टी शिकवत असते. म्हणून संस्काराचे कार्य 'मातृमुखेन शिक्षणम्' अशा जिव्हाळ्याने करायला हवे. चंगळवाद व हिंसेवर विजय मिळवण्यासाठी आईकडून बालकांवर संस्कार झाले पाहिजे.

गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.