सुजाण पालकत्व

मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे. बिंदुमात्र अशा छोट्याशा मानवाने सृष्टीची अगणित रहस्ये आजवर उलगडली आहेत. तात्पर्य, अशा अफाट क्षमतेचा हा माणूस मुळातच ईश्वराच्या उत्तम अविष्काराचे सजीव उदाहरण आहे. अशा

माणसाचा जन्म होणे ही साधीसुधी घडणारी जैविक प्रक्रिया मात्र नाही. ते ईश्वराचे मोठे नियोजन आहे.
या नियोजनामुळेच आजवर अनेक चिरंतन कीर्तीच्या महान व्यक्ती होऊन गेल्या. त्यांनी केलेला त्याग, तप, संशोधन, ग्रंथनिर्मिती, अपार सहनशीलता, संस्कृती निर्माण करण्याचे कार्य, मानवकल्याणाचे कार्य हे त्या थोर विभूती असल्याचे चिरंतन दाखले आहेत. अशा देवतुल्य व्यक्ती साधारण माणूस म्हणुनच जन्माला आलेल्या असतात. परंतु त्यांची जडणघडण दूरदर्शी सुजाण पालकांकडून, त्या काळच्या समाजाकडून, ज्ञानाच्या प्रदीर्घ अध्ययनातून, सभोवतालच्या जाणिवेतून, संस्कृतीच्या संस्कारातून होत असते. म्हणुन
प्रत्येक बालकाला असे पर्यावरण, परिस्थिती व पालकत्व मिळाले तर त्याच्या जाणिवेच्या, कर्तव्याच्या, कल्पनेच्या कक्षा रुंदावतील व महानतेच्या पंथाचा तोही एक वाटसरु बनेल, यात शंका नाही.
कारण प्रत्येक अस्तित्वाच्या गाभ्यात महानता व हीनतेची बीजे दडलेली आहेत. ज्या प्रकारच्या सामाजिकतेचे, काळाचे, संस्काराचे माध्यम असेल त्याप्रमाणे ते अस्तित्व आकार व व्यक्तिमत्व धारण करते. बर्‍याच वेळा ही प्रक्रिया द्वंद्वात्मक असते. द्वंद्वात्मकताच उत्क्रांतीची जनक असते.

मानवाच्या अस्तित्वास मानवपणास घातक अशा वातावरणात मानवपणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी काही व्यक्ती 'नारायणत्व' प्रबळ करीत, महानतेच्या बीजाचे अंकुरण, पल्लवन करीत जन्माला येतात. त्यांच्यातील 'नारायण' शक्तीला तीक्ष्ण करण्यासाठी विधाता दुःखाचे, प्रतिकूलतेचे, यातनांचे ढीग रचतो. प्रत्येक क्षणी आंतरिक सामर्थ्य परजून धीरगंभीरतेने महान व्यक्ती या दुःखाला पराजित करुन त्यातून जीवनप्रेरणा प्रसारित करते. तात्पर्य, आजवर सर्व संतांनी दुःख, वेदनांना सहज स्वीकृती देऊन त्याचे स्वागत केले, त्याचे कारण हे सत्य आहे. रामत्व आपणास अगाध थोरवी, उदात्ततेचा बोध करुन देते. प्रत्येक प्रसंगी यातनाचक्रातून जात असतांना रामाने धैर्य, विवेक, गांभीर्य ढळू दिले नाही. प्रत्येक प्रसंगी त्याने आपले आत्मिक, नैतिक सौंदर्य, उच्चता प्रमाणित केली. प्रत्येक सुख-दुःखात समरस राहुन त्याने कर्तव्यात कसूर केली नाही, तसेच आदर्शाला उणेपणा येऊ दिला नाही. तेच श्रीकृष्णाच्या बाबतीत सांगता येईल. श्रीकृष्णाचा जन्मच कारावासात झाला. नवजात बालक मुसळधार पावसात दुथडी भरुन वाहणार्‍या यमुनेच्या पुरातून रात्री गोकुळात जातो अशी नियती आजवर कोणत्याही सामान्य बालकाला मिळालेली नाही. परमेश्वर स्वतः मानव बनतांना आपली कुंडली अशी संकटग्रस्त, दुर्धर व पिडामय बनवतो, याचे इंगित काय असावे? याचा विचार करण्याची वेळ आज आहे.

अनेक प्रकारच्या दुष्प्रवृत्तींच्या अन्यायाने भरडुन निघणार्‍या, निराशेने ग्रासणार्‍या, हताशेने अगतिक होणार्‍या सज्जन, पापभिरु, विचारी माणसाची मती कुंठीत करणारे, त्याला व्यसनाधीन करणारे, त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारे, त्याला चुकीच्या मार्गाने वाताहतीकडे नेणारे आजचे वातावरण आहे. आजवरच्या सर्व रुढ मान्यतांना प्रश्नचिन्हे दिली जात आहेत. अनुभवांनी अपरिपक्व; परंतु मानसिक तीव्र भावावेगाने झपाटणारी तरुण पिढी विध्वंस प्रवृत्ती व चंगळवादी मनोवृत्तीची शिकार बनते आहे. त्यांच्यासाठी हे विचारमंथन आवर्जुन होते आहे.

प्रत्येक माणसात लढाऊ बाणा आहे, क्षात्रतेज आहे. प्रत्येक जण प्रतिभावंत आहे. दुःख तुमच्या विकासाचे निमंत्रण आहे. या भावना युवकांमध्ये घट्ट रुजवुन त्यांना सकारात्मक व दूरदर्शी विचार करायला लावणे हे काळाने दिलेले कर्तव्य आहे. सामुदायिक सहजीवनाचे ते एक कार्यउद्दिष्ट आहे. अशा व्रतस्थ वृत्तीने दिंडोरी प्रणित मार्गात बालसंस्काराचे – युवाप्रबोधनाचे कार्य केले जाते आहे.
भगवान श्री स्वामी महाराज, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठिशी आहे", असे म्हणतात, तेव्हा अभिप्रेत असते की तू प्रतिकूलतेशी संघर्ष कर, तू अन्यायाचा विरोध कर, तू आंतरिक सामर्थ्य वाढव, तू निराशेने, दुःखाने खचून जाऊ नकोस, तुझा विवेक मलीन करु नकोस, मानवता सोडू नकोस, विकारांच्या आहारी जाऊ नकोस. अशी मनोवृत्ती श्रध्दामय, आस्थामय मनोवृत्ती असते.
त्यांनाच ईश्वराचा आधार मिळतो; कारण त्यांची सत्यनिष्ठा कुठल्याही परीक्षेने डगमगत नाही की अनन्यता भंग होत नाही.
अशा सेवेकर्‍यांचा सदैव आधार, पाठबळ श्री स्वामी महाराज आहेत. म्हणुन अशी मनोवृत्ती धारण करुन त्याचे चालते – बोलते कर्मनिष्ठ आदर्श पाल्यांसमोर, युवकांसमोर उभे करणे हे सर्व पालकांचे कर्तव्य आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपला मुलगा श्रीराम, श्रीकृष्ण व्हावा असे वाटते, प्रत्येक मुलगी लक्ष्मी, सरस्वती असावी असे वाटते. तर आपण त्यासाठी 'पालक' म्हणुन काय देत आहोत, याचा अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.
"पालक होणे म्हणजे विष्णुत्वाची शक्ती धारण करणे. ती एक साधना, जागरुकता, तपश्चर्या आहे, अशा आध्यात्मिक भावनेने कर्तव्ये पार पाडावी लागतील!"

- गुरुमाऊली प. पुज्य श्री आण्णासाहेब मोरे
गुरुमाऊलींचा संदेश –विद्यार्थ्यांसाठी

बालगोपालांनी रोज आई-वडिलांना नमस्कार करावा तसेच गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, सूर्य मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, सरस्वती मंत्र रोज म्हणावे. आहार – विहारावर नियंत्रण ठेवावे. संस्कृत श्लोक, स्तोत्र व मंत्राच्या नित्य पाठांतराने स्मरणशक्ती वाढते, वाणीला धार येते, अंगी चातुर्य व धैर्य येते, शब्दोच्चार स्पष्ट करता येतात, निर्भयता निर्माण होते, ज्ञानवृध्दी होते, पापभीरु वृत्ती निर्माण होते, व्यक्तित वैचारिक बैठक व पातळी निर्माण होते, प्रतिभाशक्ती वाढते, सूक्ष्म अर्थांचे आकलन होऊन ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती तीव्र बनते, इ. अनेक फायदे याद्वारे मिळतात. मात्र हे सर्व एकाच दिवशी झटपट होणे शक्य नाही हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे. यासाठी अपार मेहनत घ्यावी लागेल, अखंड सायास करावे लागतील. यशोशिखर गाठणे तितकेसे सोपे नाही; मात्र ध्रुव्राचे मनोबल अंगी असेल तर ते सहज शक्य आहे.