विद्यार्थी

विद्यार्थ्यांनो! विद्यार्थी शब्दाचा अर्थ आहे, 'जो विद्या अर्जन करतो' अर्थाय जो विद्या मिळवतो. तेव्हा विद्या प्राप्त करणं हेच आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. आपण ज्ञान मिळवत आपल्या सभोवती असलेल्या या समाजाविषयी भान असणं, जाणिवा निर्माण होण हे अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा प्राप्त केलेले ज्ञान आपण समाज उपयोगी कार्यात अवश्या वापरलं पाहिजे.

हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला पहिले गुरुंकडे गेले पाहिजे. मनुष्य जन्मल्यानंतर तो मासाचा गोळा असतो, त्याला मनुष्य ही संज्ञा प्राप्त होण्यासाठी पाच गुरुंची आवश्यकता असते. पहिले गुरु त्याचे आई-वडिल, दुसरे प्राथमिक शाळेचे शिक्षक, नंतर माध्यमिक शाळेचे शिक्षक नंतर व्यवसाय शिक्षण देणारे शिक्षक आणि त्यानंतर आध्यात्मिक शिक्षण देणारे गुरु. भारतीय संस्कृती पाच सुत्रांवर आधारलेली आहे.
१. मातृदेवो भव २. पितृदेवो भव ३. आचार्य देवो भव ४. अतिथी देवो भव ५. राष्ट्र देवो भव.

*मातृ देवो भव*
माता एव परम् गुरुः।
लेकुराचे हित । जाणे माऊलीचे चित्त ॥
ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥

खरोखर जन्मदात्री आई आपल्या बालकाचे हित करण्यामध्ये इतकी गढून गेलेली असते की स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता बालकासाठी ती प्रयत्नशील असते. अशी माता सर्व प्रथम आपली गुरुच असते. जीवनदान तर करतेच शिवाय ज्ञान व संस्कार देण्याचेही कार्य सर्व प्रथम माताच करत असते. लक्षात ठेवा, आपण कितीही मोठे झालो तरिही आपल्या आईसाठी आपण लहानच असतो. आणि अगदी लहान मुलाची काळजी घ्यावी तशी काळजी आपली आई घेत असते. साक्षात परमेश्वर देखिल या मातृप्रेमाने वेडा झाला होता. आपले सुध्दा प्रथम कर्तव्य काय असेल तर त्या मातेची सेवा करणे व तिला दुःखापासुन, संकटापासून दूर करणे व जाणीव ठेवुन तिची सेवा करावी.

*पितृ देवो भव*

मुलांनो, 'पितृदेवो भव' असा संदेश आपल्याला वैदिक उपनिषदात दिलेला आहे. आपले वडिल हे आपले दुसरे गुरु आहे. ते आपले जनक आहेत. तेव्हा त्यांची आयुष्यभर आपण सेवा करावी. पितृभक्तांनी वडिलांची सेवा वेगवेगळ्या कार्याने केलीली आपल्याला पुरांणांमध्ये वाचण्यात व एकण्यात येते. मग ते देव असो अथवा महापराक्रमी पुरुष असो. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांनी सुध्दा पितृभक्ती केली. वडिलांची आज्ञा पालनासाठी त्यांनी चौदा वर्ष वनवास स्विकारला. त्याचप्रमाणे महाभारतात ज्यांचे विशेष वर्णन आहे अशा पितामह भिष्मांनी सुध्दा त्यांचे पिता "शांतनु" यांच्या इच्छापूर्तीकरिता राज्यपदाचा त्याग केला होता. तेव्हा आपण आयुष्यभर आपल्या आई-वडिलांची सेवा करण्याचा संकल्प करा.

*आचार्य देवो भव*

विद्यार्थी मित्रांनो जीवनात गुरुंचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. आपले प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि माध्यमिक शाळेचे शिक्षक हे आपले पुढचे गुरु. आयुष्यभर आठवणीत राहणारी शाळा आणि शाळेतले शिक्षक हा आयुष्यात एक मोठा ठेवा असतो. शाळेत शिकलेले आपल्याला आयुष्यभर कामास येते असा सर्वच जणांचा खास अनुभव असतो. तेव्हा आपल्या शाळेतील शिक्षकांचा आदर करा, त्यांचा सन्मान ठेवा. त्यांच्याबद्दल चांगलं बोला.

*अतिथी देवो भव*

भारतीय संस्कृतीने अतिथीला देवस्वरूप मानलेले आहे. आपल्याकडे भोजनाच्या वेळेस येणाऱ्या अतिथीला विमुख पाठविले जात नाही. दारी आलेल्या अतिथींचे सन्मानपूर्वक स्वागत करणे हि आपली संस्कृती आहे. या संदर्भात आचार्य विनोबांचे उद्गार लक्षात ठेवण्यासारखे आहेत. ते म्हणतात ,"भूक लागल्यानंतर जेवन घेणे ही आपली प्रकृती. भूक नसताना खाणे हि विकृती. दाराशी एखादा भुकेला आला तर त्याला अर्धी भाकरी देणे हि आपली संस्कृती." हाच अतिथी धर्म, दररोज करावयाच्या पंचमहायज्ञात सज्जन व्यक्तीला जेवण देणे किंवा एखाद्याला चहापान देणे, लहान मुलांना गोळी बिस्किट देणे इ.बाबी असतात. समाज ऋणातून येथे मुक्तीचा संबंध येतो. अतिथी धर्मातही हीच बाब येते.

पुराणात अतिथी सन्मानाच्या अनेक कथा आहेत. महाभारतातील राजा मयूर ध्वजाची कथा प्रसिद्ध आहे, आपल्याकडे आलेल्या अतिथीला संतुष्ट करण्यासाठी त्याने आपले स्वतःचे शरीर चिरण्याची संमती दर्शवली होती, माता चांगुनाने उखळात आपल्या मुलाचे शिर कांडण्यास पुत्र प्रेम आडवे येऊ दिले नाही, माता अनसूयेने अतिथी विन्मुख जावू नयेत म्हणून आपले पातिव्रत्य पणास लावले होते, राजा हरीश्चंद्र, कर्ण आणि बळीराजाने आपले सर्वस्व अतिथी प्रसन्नतेसाठी अर्पण करून अतिथी धर्माचे पालन केले.

वर्तमान युगात अतिथी धर्माला कालानुरूप सामोरे जाता येवू शकेल, दारी आलेल्या याचकाला शक्य ते देणे, किमानपक्षी अपशब्द न वापरणे, घरी आलेल्या व्यक्तींचे योग्य ते स्वागत करणे, हा हि अतिथी धर्मच आहे.

* राष्ट्र देवो भव *

बहुविध महान उज्वल परंपरा लाभलेला भारत देश अनेक कारणांमुळे दीर्घ काळ परकीय सत्तेखाली होता, पारतंत्र्याच्या काळात भारतीय अस्मिता अखंड तेवत ठेवण्याचे कार्य अनेक साधू संत, महंत, क्रांतिकारक, समाजसुधारक व स्वतंत्र सेनानी यांनी केले. परकीय सत्ता झुगारून देण्याचे कार्य सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यासाठी आयुष्यभर निकराची झुंज परकीय सत्तेविरुद्ध दिली. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात अनेक राजांनी स्वइछेने उडी घेतली व परकीयांना हाकलून लावण्याचा निकराचा प्रयन्त केला .

स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतीय जनतेने प्रदीर्घ आणि अभूतपूर्व असा लढा दिला. अनेकांनी आपल्या सर्वस्वावर पाणी सोडले. मरण प्राय यातना सहन केल्या. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. परंतु ध्येयापासून ते परावृत्त झाले नाहीत. शिरीषकुमार, भगतसिंग, बाबुगेनु, अशी विविध नावे घेता येतील.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. भारतीय जनतेने उस्फुर्तपणे तो साजरा केला. युनिअन जेक जावून लाल किल्यावर तिरंगा झेंडा फडकला.

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय प्रजासत्ताक गणराज्याची स्थापना झाली. भारत हि आपली मातृभूमी आहे. ती देवता स्वरूप आहे. राष्ट्र देवो भव! हि संकल्पना प्रथम १९१६ साली लो.टिळकांनी मांडली. त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात जनतेने त्यांना मानपत्र अर्पण केले तेव्हा लोकमान्य टिळक म्हणाले, "मी आपला आभारी आहे. मी आपणास एकच विनंती करीन, मातृभूमीच्या आव्हानाकडे लक्ष द्या. कोणताही भेदभाव मनात न ठेवता आपण सर्वजण राष्ट्र उद्धाराचा संकल्प करू या. कार्य सिद्धीस नेण्यास परमेश्वर समर्थ आहे."

मुलांनो, भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करणे, देशहित, समाजहित यांची जपवणूक करणे आता आपल्या हाती आहे. देशभक्ताच्या जीवन चरित्रापासून स्फूर्ती घेवूया आणि देशाप्रती असलले आपले कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प करू या.

अज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, सार्वजनिक व राष्ट्रीय मालमत्तेचे सरंक्षण व जपणूक, नितीमुल्यांचे पालन इ. बाबी पार पाडणे त्यासाठी काही वेळ देणे हीच राष्ट्रसेवा आहे. आपण त्यासाठी सज्ज होवू या.

गुरुमाऊलींचा संदेश –विद्यार्थ्यांसाठी

बालगोपालांनी रोज आई-वडिलांना नमस्कार करावा तसेच गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, सूर्य मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, सरस्वती मंत्र रोज म्हणावे. आहार – विहारावर नियंत्रण ठेवावे. संस्कृत श्लोक, स्तोत्र व मंत्राच्या नित्य पाठांतराने स्मरणशक्ती वाढते, वाणीला धार येते, अंगी चातुर्य व धैर्य येते, शब्दोच्चार स्पष्ट करता येतात, निर्भयता निर्माण होते, ज्ञानवृध्दी होते, पापभीरु वृत्ती निर्माण होते, व्यक्तित वैचारिक बैठक व पातळी निर्माण होते, प्रतिभाशक्ती वाढते, सूक्ष्म अर्थांचे आकलन होऊन ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती तीव्र बनते, इ. अनेक फायदे याद्वारे मिळतात. मात्र हे सर्व एकाच दिवशी झटपट होणे शक्य नाही हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे. यासाठी अपार मेहनत घ्यावी लागेल, अखंड सायास करावे लागतील. यशोशिखर गाठणे तितकेसे सोपे नाही; मात्र ध्रुव्राचे मनोबल अंगी असेल तर ते सहज शक्य आहे.

गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.