खेळ

खेळ खेळनं हे सर्वच मुला-मुलींचा आवडता विषय! खेळाचे मुख्यतः तीन प्रकार – पहिला प्रकार म्हणजे मर्दानी खेळ, दुसरा प्रकार – बैठी खेळ आणि तिसरा प्रकार – बौध्दीक खेळ. मर्दानी खेळातुन शारिरिक क्षमतांचा विकास होतो, बौध्दीक खेळांतुन बौध्दिक क्षमतांचा विकास होतो आणि बैठी खेळ मुलांचे व्यक्तित्व विकसित करतात. आता या कंम्प्युटर युगात कंम्प्युटर गेम्स खेळणं मुलांना फार आवडतं पण जी समुह भावना आणि खेळाडु वृत्ती निर्माण होणं खेळातुन अपेक्षित आहे ती कंम्प्युटर गेम्समधुन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कंम्प्युटर गेम्स खेळण्यापेक्षा सामुहिक मर्दानी, बैठी किंवा बौध्दीक खेळ खेळावे.

आपल्या अभ्यासाच्या वेळा सांभाळुन प्रत्येकाने खेळासाठी थोडा वेळ अवश्य द्यावा. खेळामुळे शरीर निरोगी, उत्साही आणि चपळ राहते. शरीर वाढीला लागते, अनावश्यक चरबी निघुन जाते, खेळतांना जो घाम निघतो त्यातुन सर्व अशुध्द द्रव्ये बाहेर टाकली जातात, रक्ताभिसरण वाढुन रक्त शुध्द होते. खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढुन निर्णय घेण्याची क्षमता वाढते, समुह भावना वाढीस लागुन निर्भयतेने वावरण्याची, समानतेची प्रवृत्ती, खेळाडुवृत्ती वाढीस लागते.

खेळांमधुन देखिल आपण खुप काही शिकु शकतो. भगवान श्री कृष्णांनी गोकुळात त्यांच्या सख्यांबरोबर खेळ खेळतांना अनेक लीला केल्या. भगवान श्री कृष्ण अनेक खेळ खेळत असे. ते खेळ देखिल आपण शिकणार आहोत. संतांनी देखिल खेळांवर अनेक अभंग लिहिले. संतांनी खेळातुन अध्यात्म समजाऊन सांगितलं. संत रामदासांनी गावोगावी आखाड्यांची स्थापना करुन बलोपासना रुजवली. संत एकनाथांनी अनेक अभंग खेळावर लिहुन त्यातुन आध्यात्म शिकविले आहे. आपण ते एक-एक करुन शिकुया.

आपण दर पंधरा दिवसांनी एक खेळ पुर्णपणे शिकणार आहोत. सुरुवात मर्दानी खेळ "कब्बडी" ने करुया.
कब्बडी आणि हुतुतु

देशी खेळांपैकी भारतीय उपखंडात सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे कब्बडी. या खेळाची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगता येत नाही पण किमान पाचशे वर्षांपुर्वी तरी हा खेळ सुरु झाला. जुन्या वाङ्मयात "हुतुतु" हा शब्द उपयोगात आणलेला आढळतो. १९५० सालापूर्वी महाराष्ट्रात खेळला जाणारा हुतुतु हा खेळ थोड्या फार फरकाने कब्बडीच होता. हुतुतु संघात नऊ खेळाडुंचा समावेश असे आणि चढाई करतांना हु-तु-तु-तु असा दम घालावा लागे. कब्बडी संघात फक्त सात खेळाडु असतात आणि चढाई करतांना 'कब्बडी-कब्बडी- कब्बडी' असा दम घालावा लागतो.

संत एकनाथ महाराजांचे हुतुतु वर अभंग

मांडियेला डाव पोरा हुतुतुतुतु। नको घालु फेरा पोरा हुतुतुतुतु ॥१॥
लक्ष चौर्‍यांशीचा डाव खेळ मांडियेला। लक्ष जाणे तोचि तेथोंनि सुटला ॥२॥
सहा चार अठरा यांचे पडों नको डाईं। एका जनार्दनी संतां शरण जाईं ॥३॥
भावार्थ:- हा संसार एक खेळ असुन यामध्ये ८४ लक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांत जन्म झाल्यावर हा मनुष्य जन्म मिळतो. तेव्हा पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या योनींमध्ये जन्म – मृत्यच्या फेर्‍यात मुला तु पडु नको. जो लक्षाला जाणतो तोच यातुन सुटतो. सहा प्रकारचे ईंद्रीय, चार प्रकारचे वर्णाश्रम, अठरा प्रकारच्या जाती या सर्वांच्या नादी न लागता मुला तु संतांना शरण जा.

विवेक वैराग्य दोघें भांडती। ज्ञान अज्ञान पाहाती रे। आपुले स्वरुपी होऊनि एक चित्त झाली सकळ सृष्टी रे ॥धृ.॥
हुतुतुतुतुतु खेळूं रे गडीया हुतुतुतुतु खेळूं रे॥ रामकृष्ण गोविंद हरी नारायण निशिदिनीं भजन करा रे ॥१॥
हिरण्कश्यप प्रल्हादपुत्र खेळतां आले हातघाई रे। बळेंचि आला फळी फोडुनी गेला पित्यासि दिधले डायीं रे ॥२॥
राम रावण सन्मुख भिडता बरवा खेळ मांडिला रे। कुंभकर्ण आखया इंद्रजितासी तिघांसि पाडिले डायीं रे ॥३॥
कौरव पांडव हुतुतु खेळती खेळिया चक्रपाणि रे। कामक्रोध जीवें मारिला उरुं दिला नाही कोणी रे ॥४॥
एका जनार्दनी हुतुतु खेळता मन जडले हरी पायीं रे। विवेक सेतु त्यांनी बांधिला उतरुन गेले शायी रे ॥५॥
भावार्थ:- ये रे गड्या आपण हुतुतु खेळु रे, रामकृष्ण, गोविंद, हरी, नारायण असं नामसंकिर्तन करु रे. विवेक आणि वैराग्य हे आपल्यातील वाईट गोष्टींशी भांडत असतात. म्हणजेच चांगल आणि वाईटाचा खेळ आपल्या मनात चालु असतो. ज्ञान आणि अज्ञान हे भांडन बघतात. चांगलेपणा जिंकला (अर्थात आपण चांगले वागलो) तर ज्ञान बाहेर येतं नि अज्ञान दुर जातं. हिरण्यकश्यप आणि प्रल्हाद हे पण हा खेळ खेळले. यात प्रल्हाद जिंकला अर्थात चांगलेपणा जिंकला आणि वाईटपणा हरला. तेथे हा खेळ भगवान नृसिंहाने खेळवला. राम आणि रावण समोरा समोर भिडले तेव्हाही हा खेळ खेळला गेला. त्यातही रावन, कुंभकर्ण आणि ईंद्रजित हे तिघे अज्ञानाचे प्रतिक हारले. कौरव आणि पांडव हे ही हा हुतुतु (चांगुलपणा आणि वाईटाचा खेळ) खेळले. त्यांना खेळवणारा श्रीकृष्ण होता. त्यातही भगवंताने काम, क्रोधरुपी सर्व वाईटपणाचा नाश केला. तेव्हा हा हुतुतु खेळ खेळता खेळता ज्यांचे मन हरीच्या अर्थात भगवंताच्या पायावर जडले आणि ज्यांनी विवेकाचा सेतु (पुल) जोडला ते हा संसारसमुद्र उतरुन गेले अर्थात हा हुतुतु खेळ जिंकले.

अंगीचिया बळें खेळती हुतुतु। वृध्दपण आलिया तोंडावरी थुथुथु ॥१॥
कासया खेळसी वायां भजे गुरुराया। चुकविल डाया हुतुतुतु ॥२॥
एका जनार्दनी हुतुतु नको भाई। मन जिंकुनिया लागे कान्होबाचे पायीं ॥३॥
भावार्थ:- जोपर्यंत अंगात बळ आहे तोपर्यंत आपण खेळ खेळतो अर्थात संसारात विनाकारण काही-काही कामं करत वेळ वाया घालतो. जेव्हा अंगातुन बळ जाते आणि वृध्दपण येते तेव्हा तोंडात फक्त कफ – थुंकी उरते पण भगवंताच नाम येत नाही. कारे बाबा तु हा अमुल्य वेळ वाया घालवत संसाराचा खेळ खेळतो, त्यापेक्षा श्री गुरुंना शरण जा, ते तुझा संसार चक्रातुन फेरा चुकविल. ऐक भाऊराया, आपलं मन जिंकुन त्याला कान्ह्याच्या (कृष्णाच्या) अर्थात भगवंताच्या पायी लाव.

कब्बडी

ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाप्रमाणे खेळण्याच्या पध्दती देखील थोड्याफार वेगवेगळ्या असतात. परंतु मुख्यत्वेकरुन तीन पध्दती उपयोगात आणल्या जातात.

  • संजीवन पध्दती:- या पध्दतीत बाद झालेला खेळाडु क्रीडांगणाबाहेर जात असे आणि प्रतिपक्षाच्या खेळाडु बाद झाल्यावर जिवंत होऊन पुन्हा क्रीडांगणात येत असे.
  • गनिमी पध्दत:- यात १२ मिनिटांचे तीन डाव खेळविले जात आणि बाद झालेला खेळाडु संघावर लोण झाल्यावर क्रीडांगणात परत येत असे.
  • गुणांक पध्दत:- यात खेळाडु बाद झाल्याबद्दल प्रतिपक्षाच्या नावावर फक्त गुण नोंदविला जात असे.
क्रीडांगण

क्रीडांगणाची जमीन समपातळीत असावी. स्वच्छ चाळलेली माती, शेणाचा वाळलेला चुरा आणि लाकडाचा भुसा मिसळुन मऊ, मुलायम पृष्ठभाग तयार करावा. या प्रकारच्या पृष्ठभागावर झटापट झाल्यास खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता फार कमी असते.

  • क्रीडांगण आयताकृती असून वेगवेगळ्या गटासाठी आकारमान वेगळे असते. मध्यरेषेने क्रीडांगणाचे दोन समान भाग पडतात, प्रत्येक भागाला 'अंगण' असे म्हणतात.
  • पुरुष गटातील खेळाडूंसाठी क्रीडांगण १२.५० मीटर लांब व १० मीटर रुंद असते. महिला गट, कुमार गट, कुमारी गट, किशोर गट व बालगटासाठी ११ मीटर लांब व ८ मीटर रुंद असे क्रीडांगण वापरले जाते.
  • प्रत्येक क्रीडांगणाला दोन्ही बाजुंना लांबीला समांतर अशी १ मीटर रुंदीची पट्टी राखीव क्षेत्र किंवा लॉबी म्हणुन आखलेली असते.
  • पुरुष गटासाठी प्रत्येक अंगणात मध्यरेषेला समांतर अणि मध्यरेषेपासुन ३.७५ मीटर अंतरावर 'निदान रेषा' आखली जाते. महिला, कुमार, कुमारी आणि किशोर गटासाठी निदान रेषा ३ मीटर अंतरावर आखली जाते. निदान रेषा राखीव क्षेत्रात आखली जात नाही.
  • निदान रेषेला समांतर परंतु निदान रेषेपासुन १ मीटर अंतरावर निदानरेषा आणि अंतिमरेषा यांचे दरम्यान 'बोनस रेषा' आखली जाते. बोनस रेषा राखीव रेषा आखली जात नाही.
  • क्रीडांगणाच्या लांबीच्या रेषांना बाजूरेषा आणि दोन्ही टोकाकडील रुंदीच्या रेषांना 'अंतिम रेषा' असे म्हणतात.

क्रीडांगणासाठी महत्वाचे:- क्रीडांगणाच्या चार ही बाजूंना सुमारे चार मीटर रुंदीची मोकळी जागा सोडुन त्या पलीकडे प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करावी. दोन्ही अंगणाच्या मागील बाजूला बाद झालेल्या अंतिम रेषेपलीकडे २ मीटर अंतरावर बाद झालेल्या खेळाडुंना बसण्याची जागा आखलेली असते. क्रीडांगण आखलेली कोणतीही रेषा ५ सें.मी. पेक्षा अधिक रुंद नसावी.

कब्बडीतील विविध शब्द आणि त्यांचे अर्थ:-

दम घालणे:- एकाच श्वासात 'कब्बडी-कब्बडी-कब्बडी' असा शब्द पुन्हा पुन्हा उच्चार करित प्रतिपक्षाच्या अंगणात जाणे यास दम घालणे म्हणतात. ईंग्रजीत याला कान्ट (Cant) म्हणतात.

चढाई करणारा (Reider):- प्रतिपक्षाच्या अंगणात दम घालीत जाणार्‍या खेळाडुस चढाई करणारा असे म्हणतात. चढाई करणार्‍याने प्रतिपक्षाच्या अंगणास स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ करावयास हवा.

बचाव करणारा (Anti Raider):- ज्या अंगणात चढाईची क्रिया सुरु असेल त्या अंगणातील प्रत्येक खेळाडुस बचाव करणारा असे म्हणतात.

दम घालणे किंवा सोडणे (Cant or Losing Cant):- 'कब्बडी-कब्बडी-कब्बडी' असा स्पष्ट शब्दोच्चार एकाच श्वासात करीत असतांना मध्येच श्वास जाऊन पुन्हा श्वास घेतल्यास त्याला 'दम जाणे' असे म्हणतात. दम घेणे व तो सुरु ठेवणे या गोष्टी एकाच श्वासात घेणे आवश्यक आहे.

गडी बाद करणे (T.Put Out An Anti):- नियमांचे उल्लंघन न करता चढाई करणार्‍याने बचाव करण्यास स्पर्श करणे अथवा चढाई करणार्‍याचे शरीरास किंवा शरीराच्या कोणत्याही भागास बचाव करणार्‍याचा स्पर्श होऊन चढाई करणार्‍याचा स्वतःच्या अंगणात दम न सोडता स्पर्श होणे या क्रियेला गडी बाद करणे असे म्हणतात.

चढाई करणार्‍यास पकडणे:- नियमांचा भंग न करता चढाई करणार्‍यास त्याचा दम जाईपर्यंत आपल्या अंगणात पकडून ठेवणे त्यास त्याच्या अंगणात जाऊ न देणे या क्रियेस गडी पकडणे असे म्हणतात.

अंगणात सुरक्षित येणे:- नियमांचा भंग न करता चढाई करणार्‍याने दम घालित स्वतःच्या अंगणास स्पर्श करणे यास अंगणात सुरक्षित येणे असे म्हणतात. मात्र यावेळी चढाई करणार्‍याचा दम सुरु असावयास हवा.

स्पर्श:- चढाई करणार्‍याचा बचाव करणार्‍यास शरीराच्या कोणत्याही भागास कपड्याने अथवा शरीराच्या कोणत्याही अवयवाने संपर्क आला म्हणजे स्पर्श झाला असे म्हणतात.

झटापट:- जेव्हा चढाई करणार्‍या आणि बचाव करणार्‍या खेळाडूंचा एकमेकास स्पर्श होतो या कृतीत झटापट असे म्हणतात. झटापटीच्यावेळी राखीव क्षेत्राचा वापर करता येतो.

चढाई:- चढाई करणारा जेव्हा दम घालीत प्रतिपक्षाच्या अंगणात प्रवेश करतो तेव्हा त्यास चढाई असे म्हणतात.

यशस्वी चढाई:- चढाई करणार्‍याने दम घालित प्रतिपक्षाच्या अंगणात प्रवेश करुन प्रतिपक्षाच्या अंगणातील निदानरेषा किमान एकदा तरी ओलांडून दम न सोडता आपल्या अंगणात परत येणे याला यशस्वी चढाई असे म्हणतात. मात्र बचाव करणार्‍या खेळाडूंपैकी एकाशी अथवा अधिक खेळाडूंशी झटापट झाली असेल तर चढाई करणार्‍याने निदान रेषा ओलांडण्याची आवश्यकता नाही फक्त दम न सोडता आपल्या अंगणाला स्पर्श करावयास हवा.

निदान रेषा ओलांडणे:- ज्यावेळी चढाई करणार्‍याच्या शरीराचा कोणताही भाग प्रतिपक्षाच्या अंगणातील निदानरेषा आणि अंतिमरेषा यांना टेकलेला राहातो आणि बाकीच्या शरीराचा कोणताही भाग निदान रेषा आणि मध्यरेषा यामधील अंगणाला टेकलेला नसेल अशा वेळी निदानरेषा ओलांडली गेली असे समजावे.

बोनस रेषा:- निदान रेषा आणि अंतिमरेषा यांच्या दरम्यान निदान रेषेपासुन एक मीटर अंतरावर दोन्ही रेषांना समांतर अशी रेषा आखली जाते तिला बोनस रेषा म्हणतात.

बोनस रेषा ओलांडणे:- ज्यावेळी चढाई करणार्‍याच्या शरीराचा कोणताही भाग जोपर्यंत प्रतिपक्षाच्या अंगणातील बोनस रेषा आणि अंतिमरेषा यामधील जमीनीस टेकलेला राहातो व शरीराच्या कुठल्याही भागाचा मध्यरेषा व बोनस रेषा यामधील भागास स्पर्श नसतो अशा वेळी बोनस रेषा पूर्ण ओलांडली आहे असे समजावे.

पाठलाग:- आपल्या अंगणात जाणार्‍या चढाई करणार्‍यास बाद करण्याच्या हेतुने बचाव करणारा, नियमांचा भंग न करता दम घेऊन जेव्हा प्रतिपक्षाच्या अंगणात धावून जातो या कृतीस पाठलाग असे म्हणतात.

आकस्मित गडी बाद करणे (Sudden Death):- प्रत्येक बाजूस एक एक चढाई आळी पाळीने दिली जाईल व त्यास जो संघ चढाई अथवा क्षेत्ररक्षण करतांना निर्णायक गुण मिळवेल तो संघ विजयी घोषित केला जाईल. चढाईचा क्रम निर्णायक गुण मिळेपर्यंत राहील.

कब्बडीतील खेळाचे नियम:-
  • प्रत्येक संघात १२ खेळाडू असतील. एक वेळेस ७ खेळाडू क्रीडांगणात उतरतील आणि उरलेले ५ खेळाडू राखीव म्हणुन राहतील. खेळ सुरु असतांना पंचांनी एक किंवा अनेक खेळाडुंना नियमांचे उल्लंघन केल्यावरुन निलंबित केल्यास अश्य खेळाडुंएवजी बदली खेळाडू घेतले जाणार नाही, अश्या वेळी त्या संघास कमी झालेल्या संख्येवर खेळावे लागेल आणि बोनस रेषेचा नियम लागु होईल, तसेच लोण झाल्यावर कमी असलेले खेळाडुंचे संख्याइतके गुण व लोणचे दोन गुण दिले जातील.
  • सामन्याची कालमर्यादा पुरुष व कुमार मुलांसाठी २० मिनिटांचे व महिला – कुमार – मुलांसाठी १५ मिनिटांचे आणि ५ मिनिटे विश्रांती असा कालावधी असावी. विश्रांतीनंतर अंगणांची आदलाबदल करावी.
  • नाणेफेक जिंकणार्‍या संघास अंगण किंवा चढाई यापैकी एकाची निवड करण्याचा अधिकार राहील. विश्रांतीनंतर दुसर्‍या डावात पहिला डाव संपण्यावेळी जितके खेळाडू असतील तितक्याच खेळाडूंनी दुसरा डाव सुरु करावा.
  • प्रतिपक्षाच्या बाद झालेल्या प्रत्येक खेळादूगणित एक गुण विरुध्द संघाला मिळेल. जो पक्ष प्रतिस्पर्ध्यावर लोण देईल त्या पक्षास दोन गुण लोणचे मिळतील, बोनस रेषा ओलांडल्यानंतर चढाई करणार्‍यास एक बोनस गुण मिळेल.
  • खेळ चालू असतांना खेळाडूच्या शरीराच्या कोणत्याही भागाचा अंतिम मर्यादेबाहेर जमिनीस स्पर्श झाल्यास तो बाद झाला असे समजावे. पण झटापटीचेवेळी मात्र खेळाडूंच्या शरीराचा कोणताही भाग क्रीडांगणाचे मर्यादेच्या आत जमिनीस लागलेला असेल तर तोपर्यंत तो बाद झाला असे होत नाही. (संपर्क असलेला शरीराचा भाग क्रीडांगणाच्या मर्यादेच्या आत असावा.)
  • खेळ चालू असतांना खेळाडू अंतिम मर्यादेबाहेर गेला तर तो बाद झाला असे समजावे.
  • झटापट सुरु झाली की राखीव क्षेत्राचा क्रीडा क्षेत्रात समावेश होतो.
  • चढाई करणार्‍याने प्रतिपक्षाचे अंगनास स्पर्श करण्यापूर्वी दम घालण्यास प्रारंभ केला पाहिजे, उशिरा केल्यास पंचाने त्यास परत पाठवावे आणि विरुध्द संघास चढाई करण्यास सांगावे. अश्या परिस्थितीत त्या खेळाडूचा पाठलाग करता येणार नाही.
  • चढाई करणार्‍यास बचाव करणार्‍यांनी पकडले असता चढाई करणारा जर त्याच्या पकडीच्या प्रयत्नातुन सुटून सुरक्षित आपल्या अंगणात आल्यास त्याचा पाठलाग करता येत नाही. परंतु चढाई करणारा बचाव करणार्‍यास स्पर्श न करता केवळ स्पर्श करुन आपल्या अंगणात सुरक्षित परत आला असेल अशावेळी त्याचा पाठलाग करता येतो.
  • बचाव करणार्‍याने स्वतःच्या शरीराच्या कोणत्याही भागाने चढाई करणार्‍यास बुध्दीपुरस्कर अंतिम मर्यादेबाहेर ढकलू नये. तसेच चढाई करणार्‍या अथवा बचाव करणार्‍या खेळाडूस अवयव अथवा धड याशिवाय शरीराचे इतर कोणत्याही भागाने बुध्दीपुरस्कर पकडू नये. त्याचे कपडे अथवा केस धरुन पकडू नये.
  • एखाद्या संघाने प्रतिपक्षाचे सर्व गडी बाद केले अथवा बाद झाले व विरुध्द पक्षाचा गडी कुणीच पुन्हा जिवंत होऊ शकत नसेल तर त्या संघाने लोण केला असे समजावे व बाद केलेल्या खेळाडूंच्या गुणाव्यतिरिक्त लोणचे जादा दोन गुण मिळतील.
  • प्रतिपक्षाच्या एक किंवा अनेक खेळाडू बाद झाले म्हणजे दर वेळी बाद करणार्‍या संघाचा खेळाडू बाद झालेल्या क्रमांकाप्रमाणे जिवंत होतो.
  • बोनस रेषा ओलांडणे आवश्यक नाही.
    1. बोनस रेषा ओलांडल्यानंतर चढाई करणारा पकडला गेला तर तो बाद होतो व विरुध्द संघात एक गुण द्यावा. एक गुण चढाई करणार्‍यास बोनस रेषा ओलांडल्याबद्दल मिळेल. बोनस गुण चढाई संपल्यावर पंचाने आपल्या हाताचा अंगठा वर करुन जाहिर करावा.
    2. अंगणात कमीत कमी सहा बचाव करणारे खेळाडू असतील तर बोनस नियम लागू होईल.
    3. बोनस गुणाबद्दल खेळाडू जिवंत होनार नाही.
    4. चढाई करणारा जर बोनस रेषा ओलांडून बचाव पक्षातील एक किंवा अनेक खेळाडूंना स्पर्श करुन आपल्या अंगणात सुरक्षित आला तर त्यास एक बोनस गुण आणि बाद केलेल्या खेळाडूंचे गुण द्यावे.
  • कोणत्याही संघाने आपला खेळाडू चढाईस पाठविण्यास पाच सेकंदापेक्षा अधिक कालावधी देऊ नये.
गुरुमाऊलींचा संदेश –विद्यार्थ्यांसाठी

बालगोपालांनी रोज आई-वडिलांना नमस्कार करावा तसेच गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र, सूर्य मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र, सरस्वती मंत्र रोज म्हणावे. आहार – विहारावर नियंत्रण ठेवावे. संस्कृत श्लोक, स्तोत्र व मंत्राच्या नित्य पाठांतराने स्मरणशक्ती वाढते, वाणीला धार येते, अंगी चातुर्य व धैर्य येते, शब्दोच्चार स्पष्ट करता येतात, निर्भयता निर्माण होते, ज्ञानवृध्दी होते, पापभीरु वृत्ती निर्माण होते, व्यक्तित वैचारिक बैठक व पातळी निर्माण होते, प्रतिभाशक्ती वाढते, सूक्ष्म अर्थांचे आकलन होऊन ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती तीव्र बनते, इ. अनेक फायदे याद्वारे मिळतात. मात्र हे सर्व एकाच दिवशी झटपट होणे शक्य नाही हे येथे लक्षात घेणे जरुरीचे आहे. यासाठी अपार मेहनत घ्यावी लागेल, अखंड सायास करावे लागतील. यशोशिखर गाठणे तितकेसे सोपे नाही; मात्र ध्रुव्राचे मनोबल अंगी असेल तर ते सहज शक्य आहे.