पर्यावरण व आपण

नेहमी कानावर पडणारा परवलीचा झालेला शब्द म्हणजे पर्यावरण होय. आज पर्यावरणाची स्थिती आज खुप ठासाळलेली आहे. प्रत्येक व्यक्ती पर्यावरणाबाबत काही ऐकतो किवा बोलतो तरी पण त्याप्रमाणात पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे ठोस प्रयत्न होताना दिसत नाही. वैज्ञानिक प्रगती इतकेच माणसाने जर पर्यावरणाच्या रक्षणाकडे लक्ष दिले तर आज ही बिकट परिस्थिती उदभवली नसती. निसर्गाने विविध सजीवांमध्ये संतुलन निर्माण करून ह्या सृष्टीला सजविले, पण मानवाने निसर्गाचे दोहन करून निसर्ग चक्रामध्ये असंतुलन निर्माण केले. पर्यावरणाचे संतुलन राखत मानवाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या सजीवांच्या अनेक जाती मानव नष्ट करत आहे. क्षणोक्षणी दिसणाऱ्या विविध पक्षी व प्राण्यांच्या जाती पाहण्यासाठी आज प्राणी संग्रहालयात जाऊन पाहावे लागते. चिमण्या, गिधाडं, कावळे, माळढोक, कौंच, साप, माकड, वाघ, चित्ता असे विविध प्राणी अस्तित्वाची लढाई लढत आहेत. दररोज वर्तमानपत्रांमध्ये रकानेच्या रकाने भरून जागृती केली जाते, पण वेळ आहे कुणाला ही मानसिकता पाहायला मिळते. आपल्या डोळ्यासमोर विविध पक्ष्यांची सरेआम विक्री केली जाते, थोडावेळ हळहळ व्यक्त करून मोकळे होण्याचे दिवस आता गेलेत. पक्षी व प्राणी यांची तस्करी तसेच विक्री करणाऱ्यांच्या हालचालींवरही सामान्यांनी कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे.

नामशेष (नष्ट) झालेल्या जाती पुढीलप्रमाणे -
सजीवांच्या जाती जातींची संख्या
सस्तन प्राणी ८३ जाती 
सरपटणारे प्राणी २१ जाती 
पक्षी ११३ जाती 
उभयचर प्राणी २ जाती 
मासे २३ जाती 
अपृष्ठवंशीय प्राणी ९८ जाती 
सपुष्प वनस्पती ८३४ जाती 

वरील नष्ट झालेल्या सजीवांच्या जातींची आकडेवारी लक्षात घेतल्यास असे लक्षात येते कि, पर्यावरणातील असमतोलाने एके दिवसी सृष्टीवरील मानवजातहि नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. सजीवांच्या उपयोगाबाबत बोलायचे झाल्यास कितीतरी उदाहरणे देता येतील, पिकांवर येणारी टोळधाड आणि लष्करीअळी चिमण्यांच्या माध्यमातून नियंत्रित केली जाते, सापांच्या माध्यमातून पिके नष्ट करणाऱ्या उंदरावर व पर्यायाने प्लेग सारख्या रोगावर नियंत्रण केले जाते, अन्थ्राक्ससारख्या महाभयंकर रोगाच्या 'करीअन' या विषाणूला आला घालण्याचे सामर्थ्य गिधाडांमध्ये आहे. पर्यावरणाच्या नाशामुळे हजारो वनस्पतींच्या जाती संपृष्टात आल्यात पण खरतर विविध आजारांवरील उपचाराचे सामर्थ्य झाडांमध्ये आहे. आपण पर्यावरणाचे नाश म्हणजे पर्यायाने आपलाच विनाश करत आहोत. आताही जागरुकता वाढविली नाही तर वाईट प्रसंग ओढवेल. जे सजीव जिवंत आहेत ते सुद्धा संग्रहालयात शोधावे लागतील. ही जबाबदारी सर्वांवर येऊन ठेपली आहे. मला काय त्याचे किवा माझ्या एकट्याने काय बिघडते ही भूमिका घेऊन आता चालणार नाही.

पाणी

पृथ्वीतलावर तीन रत्ने आहेत जल, अन्न आणि सुभाषित. परंतू मुर्ख माणसे दगडांच्या तुकड्यांना रत्नांची संज्ञा देतात. असे प्राचीन ग्रंथामध्ये, सुभाषितकारांनी यथायोग्य वर्णन केले आहे. रत्नतुल्य किंबहुना त्यापेक्षा मौल्यवान असलेले पाणी हे सजीवांचे प्राण होय.

भारत हे विविधतेचे राष्ट्र आहे. भारतात जवळपास २००० (दोन हजार) नद्या आहेत, अनेक धरणे आहेत तसेच वार्षीक सरासरी पर्जन्याचे प्रमाण १२०० मि.मि. एवढे आहे. परंतू उन्हाळ्यात पाण्याचे संकट एवढे रूद्ररूप धारण करते की, जणू अवर्षनच झाले असावे. एकट्या महाराष्ट्रात ४०,००० (चाळीस हजार) खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावरून जलसंकटाची कल्पना येणे शक्य आहे. शेतीव्यवसाय, औद्योगिकरण, विजनिर्मिती, मानव, प्राणी, अन्यसजीव, वनस्पती आदिंसाठी लागणा-या पाण्याची टक्केवारी २.७ टक्के एवढीच असतांनाही मानव मात्र जलसाक्षरतेकडे दुर्लक्ष करीत आहे. उपरोक्त सजीवांचे अस्तित्व हे वनांची कत्तल, शहरीकरण, औद्योगिकरण, दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्याचे प्रमाण, तापमानातील वाढ यांमुळे बाबींमुळे धोक्यात आले. वनांच्या कत्तलीमुळे वाहून जाणा-या पाण्यातील अडथळे कमी झाले त्यामुळे पावसाचे पाणी जलदगतीने समुद्रात वाहुन जाते. जमिनीत पाणी मुरत नाही. त्यामुळे जलसाठा कमी होत आहे. या सर्व बाबी नियंत्रित करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचे सुयोग्य नियोजन महत्वाचे आहे. पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्याने, दरवर्षी धृवीय प्रदेशातील हिमपर्वत (ग्लेशिअर) १० फुट या गतीने वितळत आहेत. या प्रकारामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढून अनेक बेटे आणि अनेक देशांचा किनारी प्रदेशातील भूभाग नजिकच्या भविष्यात पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या -हासामुळे एकामागून एक अशी श्रृंखलाच निर्माण होत आहे. ह्या समस्या मानवाने आपल्या महत्वाकांक्षेनेच निर्माण केल्या आहेत. याबाबत आजच्या पिढीने जागरूक होणे गरजेचे आहे. मनुष्याच्या अवाक्याबाहेरील अवजड कामे करणे शक्य झाले, पृथ्वीवरील नव्हे तर परग्रहावरील माहीती मिळविणे अंतराळयात्रा करणे शक्य झाले. या सर्व बाबींसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराचे प्रमाणही वाढले. परंतू ह्या निसर्गाच्या समतोलाकडे दुर्लक्ष झाले. जलप्रदुषण ह्यासारखी नवी समस्या व्यापक स्वरूपात समोर आली. कारखान्यांमधून निघणा-या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात घातक रसायने सोडली जातात. ते पाणी नदी, नाले यांना दुषीत करते. रसायनयुक्त पाणी जमिनीत मुरल्यावर, दैनंदिन वापराच्या जलस्त्रोतांमध्ये ती रसायने मिसळली जातात.

चिरंतन विकास व पर्यावरण

पृथ्वीवरील सार्या सजीव सृष्टीचा आधार हे येथील पर्यावरण आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर व विश्वात इतरत्र असे पर्यावरण नाही. त्यामुळे येथील पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे मानव जातीस नव्हे तर सर्व सजीव सृष्टीस अत्यावश्यक आहे. कोट्यावधी वर्षांच्या स्थित्यंतरानंतर येथील हवा, पाणी व जमीन यांचे असे पोषक वातावरण झाले असले तरी गेल्या काही दशकात मानवी उद्योगांमुळे त्यात बरेच हानीकारक बदल होऊ लागले आहेत. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, उद्योगधंदे आणि जंगलाचा नाश करुन वाढलेली शेती यामुळे उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीत घट होत आहे. तसेच हवा, पाणी व जमीन यांच्या प्रदूषणाचा प्रश्न वाढत चालला आहे. पायाभूत विकास व औद्योगिकीकरण या गोष्टी तर सर्वच देश अग्रहक्काने करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र हे करत असताना पर्यावरणाच्या रक्षणाची काळजी न घेतल्याने दिवसेंदिवस पर्यावरणाचा दर्जा खालावत चालला आहे. कारखान्यातून बाहेर पडणारा धूर व स्वयंचलित वाहनातून पेट्रोल जाळण्याने निर्माण होणारा दूषित वायू, शिसे व काजळी यामुळे हवा प्रदूषित होत आहे. उद्योगधंदे व शहराच्या सांडपाण्यामुळे जमिनीवरील नदी, तलाव यांचे पाणी दूषित होत आहेच. शिवाय जमिनीखाली असणार्या पाण्याचेही प्रदूषण होत आहे. शेतीसाठी पाण्याबरोबर वापरली जाणारी रासायनिक खते पाणीप्रदूषणास कारणीभूत तर आहेतच. शिवाय शेतीसाठी अतिरिक्त पाणी वापरल्याने जमिनीत क्षार वाढून मीठ फुटण्याचे व सारी जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. पायाभूत विकासासाठी होणारे प्रकल्पही पर्यावरणाच्या नव्या समस्या निर्माण करीत आहेत. माणसांच्या गरजा वाढल्यामुळे त्यांच्या विकासाचा वेगही त्यानुसार वाढविण्याची धडपड सर्वत्र चालली आहे. मात्र हा विकास करताना आपण पुढील विकासाच्या सर्वच संधी नाहिशा करून टाकीत नाही ना याविषयी माणूस फारसा विचार करताना दिसत नाही. आजची गरज भागली म्हणजे झाले. उद्याचे कोणी बघितले ? अशी वृत्ती झाली आहे व ती पर्यावरणास घातक आहे.

शेतकर्यास जमीन चांगली ठेवण्यासाठी पिकांची फेरपालटी घ्यावी, पाण्याचा व रासायनिक खतांचा कमी वापर, ऊसासारख्या नगदी परंतु जास्त पाणी लागणार्या पिकांऎवजी दुसरी पिके घ्यावी असे कितीही सांगितले तरी ते सहसा पाळले जात नाही. जमीन नापीक होत चालली आहे हे पाहूनही त्यात बदल होत नाही. त्वरित लाभ मिळविण्याच्या हव्यासापोटी दूरदर्शी योजनेकडे दुर्लक्ष होते.

जे शेतकर्यांचे तेच उद्योगधंद्यांचे. उत्पादनखर्चात बचत करण्यासाठी सांड्पाण्यावर प्रक्रिया करण्याकडे चालढकल केली जाते. नगरपालिका / महानगरपालिका यांना शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणेचा खर्च व ती चालविण्यासाठी लागणार्या विजेचा खर्च झेपत नाही. साहजिकच प्रदूषण वाढतच जाते. जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण होते. एकंदरीत काय? नैसर्गिक साधनसंपत्तीचे भांडार असणारे पर्यावरण आपल्या साहाय्यास सज्ज असताना सोन्याची अंडी देणारी कोंबडीच कापणार्या लोभी माणसाप्रमाणे आपण पर्यावरणाचे अतोनात व भरून न येण्यासारखे नुकसान करीत आहोत. यावर काही उपाय आहे का? पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विकास थांबवावा म्हटले तर वाढत्या गरजा भागविणे अवघड होणार व विकास केला तर पर्यावरण दूषित होणार.

नियोजनबद्ध चिरंतन विकास हे यावर उत्तर आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे, अपारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे, प्रदूषण नियंत्रणासह विकासयोजना आखणे व टाळता न येण्याजोग्या पर्यावरण हानीबद्दल भरपाई म्हणून पर्यावरण संवर्धनाची योजना पर्यावरणाचा दर्जा आपण टिकवू शकू. तसेच हवा, पाणी, जमीन या घटकांची प्रदूषके सामावून घेण्याची श्क्ती ही मर्यादा धरली तर त्या धोकादायक मर्यादेपेक्षा खाली आपल्या आजच्या व भविष्याच्या विकासामुळे होणार्या प्रदूषणाचे प्रमाण राहील अशी आपण काळजी घेतली पाहिजे. आपले जीवनदायी पर्यावरण हा पूर्वजांकडून मिळालेला मालकीहक्काचा वारसा नसून आपल्या पुढील पिढ्यांकडून उसना घेतलेला ठेवा आहे हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कर्ज जसे व्याजासह परत फेडावे लागते तसे हे पर्यावरण अधिक सुखदायी व सुरक्षित कसे करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. आपल्या मुलाबाळांच्या विकासाच्या आशाआकांक्षा उमलतील असे पर्यावरण पाहिजे. 'कुठलीही मानवी समस्या कधीही कायमची सुटू नये हा जीवनाचा अलिखित नियमच आहे. आजच्या समस्या आपल्याला सुटल्यासारख्या वाटतात, पण त्या सुटतात उद्याच्या नवीन समस्यांना जन्म देऊन,' हे उद्गार आहेत, वि. स. खांडेकरांचे. विशेष म्हणजे हे विधान पर्यावरण व मानव यांच्या संदर्भात तंतोतंत लागू पडते.

आपण ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा करतो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

पर्यावरण शिक्षण

यात पर्यावरणाविषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करणे महत्वाचे आहे. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर तसेच वैयक्तीक स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात सर्व बालसंस्कार केंद्रातुन देण्याचे प्रयत्न होत आहे; जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन पुढील पिढ्यांमध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे तसेच वैयक्तीक जीवनात प्रत्यक्ष पर्यावरण पूरक वस्तुंचा वापर वाढवुन समाजात तस वातावरन निर्माण करणं ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये ठरविण्यात आली आहे.

गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.