सुसंस्कार
चित्रं क्रमाद यथानेकै रंगैरुन्मील्यते शनैः । ब्राह्मण्यपि तद्वत स्यात् संस्कारैर्विधीपूर्वकैः

तूलिका किंवा ब्रश कागदावर पुन्हा-पुन्हा हळुवरपणे फिरवला, तर चित्र अधिक सुंदर बनते. त्याचप्रमाणे सुयोग्य पध्दतीने बालमनावर सुसंस्कार केल्यास बालकांमध्ये ब्रह्म जाणण्याचे आंतरिक सामर्थ्य स्वाभाविकपणे विकसित होते. भारतीय समूहमन नेहमीच नराचा नारायणबनण्यावर विश्वास व्यक्त करते. माणसाला देवपण संस्कारांतून आविष्कृत व मजबूत होत असतात. मानवाच्या मनाचे भाव विशाल बनणे, त्याला योग्य कृतीची निवड करता येणे, योग्य सर्वहितकारी निर्णय घेता येणे, त्याच्या अंतःकरणात अनश्वराची ओढ निर्माण होणे, भव्य, उत्तुंग घडवण्याची प्रेरणा जागणे, त्यासाठी परिश्रमांची तयारी असणे, इतरांशी सामंजस्याने, सहकार्याने वागणे, विनम्रता व सद्गुणांची जोपासना सतत करणे, अशा प्रकारच्या मानव-चरित्राची, शीलाची जडणघडण संस्कारांनी होत असते. दोष सुधारण्याची प्रबळ इच्छा संस्कारांतून जागृत होते. मानव स्खलनशील जसा आहे तसा उन्नतीप्रियही आहे. बालमनावर होणारे संस्कार चारित्र्य व व्यक्तिमत्वाचा पाया रचणारे असतात. कोर्‍या कॅनव्हासवर चितारले जाणारे चित्र विशिष्ट आकार, रुप, अर्थ, प्रभाव व चित्रकाराची विशिष्ट ओळख घेऊन आविष्कृत होते. तद्वत बालमनावर होणारे संस्कार विशिष्ट स्वभाव, अभिरुची, व्यक्तिमत्व याबरोबरच समाजाची विशिष्ट छाप घेऊन बालकाची जडण-घडण करित असतात. म्हणुन बालपणापासून उत्तम संस्कार होणे आवश्यक आहे.

तळागाळातला, प्रतिकूल वातावरणातला, दरिद्री, पिचलेला, अनाथ, आदिवासी, ग्रामीण अशा सर्व सामाजिक स्तरांतल्या बालकांच्या संस्कारांना प्राधान्य देणे, भविष्यातले प्रत्येक सुयोग्य राष्ट्रीय व्यक्तिमत्व माणुसकीतून विकसित करणे हा दिंडोरी प्रणित सेवा मार्गातील बालसंस्कार उपक्रमाचा ध्यास आहे.

मानवाच्या बौध्दिक प्रगल्भतेतून भौतिक प्रगती होत असते. ही प्रगती कल्याणकारी होण्यासाठी परिपक्व, उच्च मानसिकतेची गरज असते. अशी मानसिकता संस्कारित जीवनप्रणालीतून विकसित होते. बालकांच्या कोवळ्या, निष्पाप मनांवर माणुसकी, सर्वसमानता, न्यायप्रियता, बंधुत्व, सदाचार, नैतिकता, श्रध्दा, आस्था, मूल्ये यांचे संस्कार झाले तर मनोबळ दृढ होते, विवेक पक्का होतो. ज्या समाजात गुणांपेक्षा पैसा, सत्ता, देखावा, दुटप्पीपणा हे यशाचे, प्रतिष्ठेचे निकष बनतात, त्या समाजात स्वार्थ व विषमता वाढीस लागून भांडवलवादी शोषक-प्रवृत्ती अधिकाधिक बळावत जातात. एक प्रकारची वैचारिक पोकळी व भावनिक अराजकता अशा समाजात निर्माण होते. त्यावर इलाज करण्यासाठी बालसंस्कार सातत्याने, स्वेच्छेने होत राहणे आवश्यक आहे. डॉ. राधाकृष्णन यांनी म्हटले आहे – "भारतासहित संपूर्ण जगाच्या दुःखकष्टांचे मुख्य कारण आजची जीवन पध्दती आहे. ही शिक्षण पध्दती फक्त बौध्दिक विकास करणारी आहे. त्यात धार्मिक, आध्यात्मिक मूल्यांचा समावेश नाही. सुयोग्य शिक्षणाने बालकांचा मूळ स्वभाव, प्रवृत्ती बदलते. त्यांना जणू नवा जन्म मिळतो. अशा शिक्षणाने त्यांची बुध्दी, मने विधायक, कल्याणकारी दिशांकडे वाटचाल करु लागतात."

वर्तमान शिक्षणातील अपूर्णता संस्कारांनी भरुन काढता येईल. चंगळवादी, व्यक्तिकेंद्रीत, स्वार्थी, भ्रष्ट अशा वातावरणात बालसंस्कार उपक्रमांची गरज महत्वाची आहे. पालकांची मनोवृत्ती सुसंस्कारित, तत्वनिष्ट, विवेकी, पारदर्शी, व्यापक असण्यासाठी आध्यात्मिक सहजीवन अनिवार्य आहे. ज्यावेळी विज्ञानाचा प्राण अध्यात्म असते त्यावेळी विज्ञान सर्वमंगलकारी बनते. बालसंस्कार वास्तव + विज्ञान + अध्यात्म या एकात्म त्रयीवर आधारलेले आहे. बालकांना जनमानसात मिळालेल्या क्षमतांचा अधिकाधिक विकास करुन लोककल्याणासाठी क्षमतांचा विनियोग करण्याची मनोवृत्ती बालकांमध्ये सहज निर्माण झाली पाहिजे. या दृष्टीने स्त्रीशक्तीचा उन्मेष ही काळाची गरज आहे. 'श्री' शक्तीने संपन्न हिंदवी सुराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी मातोश्री जिजाबाईंनी बालसंस्काराचा आदर्श उभा केला. शिवाजी राजांबरोबर त्यांच्या मावळी सवंगड्यांना अनौपचारिक बालसंस्कार या राष्ट्रमातेने दिले होते. भगवान श्रीराम, श्रीकृष्णाच्या बाललीला त्यांचे शाश्वत मानसिक धन आहे. आत्मतेज देणारे अध्यात्म व तत्वज्ञान त्यांच्या वारसहक्काने लाभलेला ठेवा आहे. हा ठेवा जतन करण्यासाठी, वाढवण्यासाठी पराक्रमी, तेजस्वी, नीतिमान पिढी घडवणे, हा बालसंस्काराचा मूलभूत हेतू आहे.

सामाजिक सहभाव, समरसता, सामाजिक बांधिलकी, आपुलकी, माणुसकी बळकट करुन राष्ट्राचे भवितव्य उज्वल करण्यासाठी मनाने कणखर, दृढनिश्चयी, साहसी, बुध्दीने प्रगल्भ, तेजस्वी पिढी घडवणे हा बालसंस्काराचा उद्देश आहे. हे आध्यात्मिक सेवा कार्य आहे. यातुन कुटुंबात सौख्य, जिव्हाळा, आनंद सतत नांदता राहुन वृध्दांना मायेचा आधार व आपुलकीचे शब्द मिळणार आहे. यातुन मूल्यवान भविष्य आकारास येणार आहे. थोडक्यात – "संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल". अन्यथा मानसाचा –हास थांबवता येणार नाही.

- गुरुमाऊली प. पुज्य श्री आण्णासाहेब मोरे
गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.