शिक्षक – बालसंस्कार प्रतिनिधी

सेवा मार्गाच्या १२ विभागांपैकी पहिला आणि अतिशय महत्वाचा विभाग म्हणजे बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग होय. मूल्यसंस्कार हा समाजासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. समाजाची ख-या अर्थाने उभारणारी कोण असेल तर ते म्हणजे शिक्षक होय! शिक्षकच ख-या अर्थाने समाजाचे व देशाचे शिल्पकार आहे.

या राष्ट्रीय कार्यात सर्व शिक्षक तसेच मूल्यसंस्कार प्रतिनिधींचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. याकामी शिक्षक म्हणुन मूल्यसंस्कार प्रतिनिधींनी केवळ शिक्षक म्हणुन भुमिका न बजावता विद्यार्थ्यांचे जीवन, त्यांचे चारित्र्य घडेल अशा पध्दतीने सर्व उपक्रमात सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांना विविध कल्पना आणि मूल्ये आत्मसात करावयास सहाय्य करावयास हवे. एक सुजाण नागरिक म्हणुन ते राष्ट्रीय जीवनात सामील होतील याकडे शिक्षकाने लक्ष द्यावयास हवे. खरतर शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरक शक्तीचा अखंड स्रोत असावयास हवे.

बालसंस्कार केंद्रात येणारे विद्यार्थी अशा वयोगटातील असतात की त्या वयात चारित्र्यास व राष्ट्रीय भावनेस पोषक असे गुण ते आपल्या अंगी बाणवू शकतात. नव्या पिढीच्या या मुलांमध्ये उच्च दर्ज्याची चारित्र्य पोषक ऊर्जा, राष्ट्रीयत्वाची जाण, सामाजिक जबाबदारीचे भान हे सारे गुण संवर्धित करण्याचे काम आपण करु शकाल. मने घडवण्याचे हे काम खुपच सकारात्मक आहे. शास्त्रीय पण मानवी वृत्तीचा विकास घडवणे, स्वयंशिस्त अंगी बाणवणे, परोपकाराची भावना वाढवणे, पर्यावरणाची जाण ठेवणे व त्याच्या रक्षणासाठी कृती कार्यक्रमाद्वारे उपाययोजना प्रत्यक्षात राबवणे, सांस्कृतीक परंपरांचा परिचय करुन देऊन त्या विविध कलांद्वारे विकसित करणे, या बाबी मुलांमध्ये बालसंस्कार केंद्राद्वारे मुलांमध्ये विकसित करणे मूल्यसंस्कार प्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहे.

बालसंस्कार कार्यात खुप रमणीयता, विविधता आणि रचनात्मकता आहे. मूल्यसंस्काराचे हे कार्य नेमुन दिलेले कार्य नसुन बालभावात रमणा-या स्वामी महाराजांची सेवा आहे. मूल्यसंस्कार प्रतिनिधींनी सतत अभ्यासुवृत्तीने या सृजनात्मक कार्यात उपक्रमशील राहावे. निष्पाप आणि अहेतुकी प्रेमाचा अनुभव म्हणजे हे कार्य आहे. एक अज्ञानी जीव ते जीवन्मुक्त भक्त हा प्रवास प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा अनुभव म्हणजे हे कार्य होय. आपल्या समोर घडवायला कच्ची माती समोर ठेवली आहे, त्यातुन वानर घडवायचा की विनायक हे शिक्षकांच्या हातात आहे. तेव्हा सर्व मूल्यसंस्कार प्रतिनिधींनी या सर्व बाबी ध्यानात घेऊन या संस्काराच्या चळवळीत आपला खारीचा वाट उचलावा, असं कळकळीचं आवाहन आपणास करित आहोत.

गुरुमाऊलींचा संदेश – पालकांसाठी

सुजाण पालकत्व : मानवास परमेश्वराने नवनिर्मितीची विलक्षण उन्मेषशालिनी प्रतिभा दिली आहे. माणूस शेकडो वर्षांच्या पलीकडचे खरे अंदाज सहजपणे सांगू शकतो. अप्रतिम चिरंतन कलांची निर्मिती तो सहजपणे लीलया करतो. जे-जे काही अदृश्य व अमूर्त आहे त्याला साकार रुप व सखोल अर्थ माणसाने दिला आहे.